रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धकांनी ‘थाई मागूर’ माशाचे संवर्धन त्वरित थांबवावे

0

केंद्र शासनाच्या कृषिमंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने ‘थाई मागूर’ (Clarias gariepinus) माशाचे संवर्धन करु नये याबाबत सूचना दिली आहे, मत्स्यशेतीसाठी १९८० च्या दरम्यान जगभरात प्रसारीत झालेल्या या आफ्रिकन माशामुळे स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट होत असल्याचे निष्पन्न झाल्याने केंद्र सरकारने ही बंदी घातली आहे. ‘थाई मागूर’ माशाबाबत राष्ट्रीय हरीत लवादाने यासंदर्भात अलीकडेच याचिका निकाली काढली संवर्धन त्वरित थांबवावे असे आदेशीत करण्यात येत आहे. हे मासे पूर्णतः नष्ट करावेत. तपासणी पथकास ‘थाई मागूर’ माशांचे संवर्धन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांनी कळविले आहे. ‘थाई मागूर’ हा मासा आफ्रिका आणि मध्य पूर्व भागामध्ये गोड्या पाण्यात आढळणारा मासा आहे. तो तलाव, नद्या, तसेच मनुष्य निर्मित मत्स्यशेतीमध्ये आढळतो. आकाराने मोठा असलेला हा मासा रंगाने गडद रंगाचा किंवा काळ्या रंगाचा असतो. आफ्रिकेतील कॅटफिश माशांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मासा गणला जातो. लांबीने ३ ते ४ फूट असलेला हा मासा ५ ते ७ फुटापर्यंत वाढ शकतो. हा मासा मासांहारी असून जीवंत किंवा मृत प्राण्यांवर तो जगतो. त्याच्या तोंडाचा आकार खूपमोठा असल्याने तो मोठे समुद्रपक्षीही खाऊ शकतो, जमिनीवरूनही काही काळ सरपटण्याचे कौशल्य असलेल्या हा मासा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही वाढू शकतो. तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्ध इतर स्थानिक माशांना तो अत्यंत धोकादायक आहे. ‘थाई मागर’ माशाला फिश फार्मिंगसाठी भारतात आणला होता. परंतु या माशामुळे स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट होत असल्याचे अभ्यासावरून दिसून आले आहे. वेगाने वाढणारा, मोठया संख्येने अंडी घालून स्वतःच्या प्रजाती वाढविणाऱ्या या ‘थाई मागूर’ माशाची भूक जास्त असल्याने तो अन्य मासे क्षणात संपवित आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलनावर व इतर स्थानिक माशांच्या प्रजातीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, न्यायालयाच्या या आदेशानुसार ‘थाई मागर’ माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घालण्यात आली आहे. या माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, रत्नागिरीमध्ये या माशाचा उपयोग केज किंवा पॉन्ड कल्चरसाठी झालेला नाही असे या विषयातील तज्ज्ञ डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here