प्रजासत्ताक दिन सोहळ्याची शिवाजी पार्कला रंगीत तालीम

0

येत्या प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्य सोहळ्याची आज रंगीत तालीम करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी सोहळ्यात सादर होणारे संचलन, विविध चित्ररथांचे सादरीकरण आदींची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी विविध पोलीस दल , अग्निशमन दल , वन विभाग , सुरक्षा रक्षक मंडळे , विद्यार्थ्यांची स्काऊट आणि गाईडस पथके, ब्रास बॅन्ड पथक यांच्यासह पोलीस दलात नव्यानेच समाविष्ठ होत असलेल्या बृहन्मुंबई पोलीस अश्वदलानेही संचलनाची रंगीत तालिम केली. शासनाच्या विविध विभागांच्या चित्ररथांचीही रंगीत तालिम घेण्यात आली. 2019 च्या महाराष्ट्र दिनी संचलन केलेल्या उत्कृष्ट पथकांना यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल (महिला), मुंबई अग्नीशमन दल यांनी प्रथम 3 पुरस्कार पटकावले. अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी चित्ररथांचे उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विभागांनाही आज पारितोषिके देण्यात आली. यात पर्यावरण विभागाच्या ‘प्लॅस्टीक बंदी जनजागृती’ या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. आदिवासी विकास विभागाच्या ‘महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची संस्कृती, शिक्षण व त्यांच्या यशोगाथा’ या चित्ररथाने द्वीतीय तर ऊर्जा विभागाच्या ‘वीज विकासाची जननी’ या चित्ररथ आणि सादरीकरणाने तृतीय क्रमांक पटकावला. गृह, गृहनिर्माण आणि सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथांना उत्तेजनार्थ पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, वरिष्ठ पोलीस अधिकारी एस. विरेश प्रभू, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव मदन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here