सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात येणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक सत्राला असलेली ऑनलाइन परीक्षा बंद करून त्याऐवजी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांप्रमाणे पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांसाठी या पूर्वीच लागू केली आहे. आता परीक्षापद्धतीत बदल करण्यात येत आहे. दरम्यान अभियांत्रिकी द्वितीय वर्षासाठी सध्या 50 गुणांची लेखी, तर 50 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. तर, एमबीएच्या 80 गुणांची लेखी परीक्षा, तर 20 गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. ऑनलाइन गुणांऐवजी आता महाविद्यालयांना ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालय स्तरावर भिन्न स्वरूपांचे प्रकल्प, उपक्रम किंवा लेखी परीक्षा याद्वारे अंतर्गत गुण देता येणार आहे. पण, त्यासाठी सुरूवातीचे काही वर्ष विद्यापीठाकडूनच महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालय स्तरावर अंतर्गत गुणांसाठी ऑफलाइन परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची, ही जबाबदारी महाविद्यालयांवर राहणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांची जबाबदारी वाढणार आहे. ही परीक्षा घेतल्यानंतर गुणांचा तपशील विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचे मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
