महाराष्ट्र पोलीस दलाचा दिल्लीमध्ये गौरव

0

केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलीस दलाच्या बिनतारी संदेश विभागाला (वायरलेस) देशातील सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वांत सुरक्षित तंत्रज्ञान वापर अशा दोन पुरस्कारांनी गौरव केला आहे. दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये नागरिकांची सुरक्षितता व आपत्ती प्रतिसाद संस्थांची राष्ट्रीय परिषद पार पडली. त्यामध्ये विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश, अर्धसैनिक दल यांचे दळणवळण प्रमुख, आपत्ती निवारण दलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेमध्ये राज्य पोलीस दलाला हे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या हस्ते राज्य बिनतारी संदेश विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांनी पुरस्कार स्विकारले. डिजिटल दळवणळण प्रणाली, उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा व डिजिटल रेडीओ ट्रॅकिंग प्रणाली अशा सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्र पोलीस दलाकडून केला जातो. असा वापर करणारे महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. तंत्रज्ञानातील बदलाच्या अनुषंगाने अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण डॉ. एपीजे अब्दुल कलाम इनोवेशन सेंटरची निर्मिती बिनतारी संदेश विभागाने केली आहे. विभागातील जे. सी. बोस ई-लर्निंग सेंटर, डिजिटल क्‍लासरुममध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व इतर राज्यातील पोलीस दलातील 250 प्रशिक्षणार्थींसाठी केद्र सुरू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here