‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग – कान्होजी आंग्रे’ हा महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईमधील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या पथसंचलनात झलक दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी, अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र, हे लक्षात घेऊन स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारले. अनेक वीरांनी या आरमार उभारणीत मोठे योगदान दिले. त्यापैकी एक कान्होजी आंग्रे होते. स्वराज्याची सेवा करताना कान्होजींच्या नेतृत्वाखाली सागरामध्ये स्वराज्याचे भगवे तोरण कसे दिमाखाने चढले, फडकू लागले. त्यांनी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले याची शौर्यगाथा चित्ररथातून उलगडून सांगितली जाईल. सुरतेपासून कोचीनपर्यंत पसरलेल्या अथांग दर्याचा सेनापती, मराठा साम्राज्याचा पहिला नौसेनापती म्हणून अतिशय धोरणीपणाने आणि मुत्सद्देगिरीने त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी सागरी तटावर काम केले. कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग याठिकाणी सुधारित जहाज बांधणी, शस्त्र्ानिर्मितीची भरीव कामगिरी केली.
