रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात पावसाने कहर केला असून, जुलै महिन्यामध्येच वाशिष्ठी आणि जगबुडी नदीला पाच वेळा पूर आला आहे. जोरदार कोसळणार्या पावसामुळे तिवरे धरणफुटीसह मोठे नुकसान जिल्ह्याला सोसावे लागले आहे. यावर्षी पावसामुळे 28 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. खासगी व सावर्जनिक मालमत्तांमध्ये तीनशे घरे, चाळीस गोठ्यांचा समावेश असून, चिपळूण-खेडमधील व्यापार्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात तब्बल सात कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. जिल्ह्यात जूनच्या पंधरवड्यानंतरच पावसाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र, गेल्या दीड महिन्यात तब्बल 2200 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुका वगळता जिल्ह्याच्या अन्य भागांमध्ये पावसाची सरासरी सर्वाधिक आहे. त्यातही खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर या सह्याद्रीच्या पट्ट्यातील तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. वेगवान वार्यासह कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्याला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, खेडमध्ये सातत्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. जिल्ह्यात खेड, चिपळूण व राजापूरमध्ये तर पाचवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार वारे व मोठ्या पावसामुळे ग्रामीण भागात घरे-गोठे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तिवरे धरण फुटीच्या घटनमुळे मोठ्या हानीला सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 28 जणांना प्राण गमवावे लागले. वीस जणांच्या कुटुबियांना प्रशासनाकडून 80 लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहेत. तिवरे धरण दुर्घटनेतील दोन प्रकरणे वारस तपासामुळे तर राजापूरमधील 2 मृत व्यक्तींची प्रकरणे बिल मंजुरीमुळे प्रलंबित आहेत. 74 जनावरे मृत पडली असून त्यापोटी 25 हजार रुपयांची मदत वाटप केली आहे. तसेच ओढकाम करणार्या 13 मृत जनावरांपैकी चार जणांच्या मालकांना 78 हजार रुपये मदत दिली गेली. पूर्णतः पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 48 असून 220 घरांचे अंशतः नुकसान झाले. अशंतः कच्च्या घरांची संख्या 245 असून त्यातील 117 मदतीसाठी पात्र आहेत. गोठ्यांची संख्या 40 वर पोचली आहे. जिल्ह्यातील 27 सार्वजनिक मालमत्तांचे 4 कोटी 59 लाख 98 हजार 800 रुपयांचे तर 21 खासगी मालमत्तांचे 23 लाख 5 हजार 203 रुपयांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 45 कुटूंबातील 152 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. महामार्गावर दरड कोसळ्याचे प्रमाण वाढले असून मुंबई-गोवा महामार्गही तीन ते चार वेळा बंद ठेवावा लागला होता.
