राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाला आता वेग येतोय. मात्र असं होत असतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांनी वेग वेगळ्या चर्चेंना तोंड फुटतंय. माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं बोलताना शिवसेनेला थेट इशाराच दिलाय. शिवसेनेसोबत सरकारमध्ये येताना काँग्रेस हायकमांडने आम्हाला अतिशय कडक आदेश दिले होते. घटनाबाह्य काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घ्या असं आम्हाला बजावण्यात आलं होतं आणि आम्ही ते उद्धव ठाकरेंना सांगितलं अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली होती. मात्र अशोक चव्हाणांचं म्हणणं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावलंय. शिवसेनेनं काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितलं की, सरकार हे राज्यघटनेने सांगितलेल्या तत्वांप्रमाणेच काम करत असते त्यामुळे काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही. अशोक चव्हाण यांनी कुठल्या संदर्भात हे विधान केलं ते माहित नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
