रत्नागिरीला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनविणार – पालकमंत्री अनिल परब

0

रत्नागिरीला असणारे समुद्र किनारे अतिशय सुंदर आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. या किनाऱ्यांचा विकास करून रत्नागिरी हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन, संसदीय कार्य मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दिमाखदार सोहळ्यात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. पालकमंत्री ॲड. परब यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे उपस्थित होते. यावेळी परब म्हणाले, यावर्षी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात दोन लाखापर्यंतच्या कर्जापोटी भरपाई देण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठीही अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. गणपतीपुळे या सर्वांचे श्रद्धास्थानाच्या विकासासाठी १२० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे. गरिबांना कमीत कमी पैशात जेवण मिळाले पाहिजे, यासाठी १० रुपयांमध्ये शिवभोजन थाळी देण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता होत असून रत्नागिरीत तीन ठिकाणी शिवभोजन आजपासून उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्याच्या संगणकीकरणाचे काम महसूल विभागातर्फे सुरू आहे. ऑनलाइन सातबारा जेथे उपलब्ध नाही तेथे ते ऑफलाइन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेत रत्नागिरीने गेल्या दोन वर्षांत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक वृक्षलागवड केली. हे अभिनंदनीय आहे. जिल्ह्यात चांगल्या आरोग्य सुविधा असणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रा मभवन उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे बांधकाम लवकर पूर्ण करणे तसेच इतर अत्यावश्यक आणि अत्याधुनिक साधनांची खरेदी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती याकडेही विशेष लक्ष येत्या काळात दिले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यात प्रौढांमध्ये दरहजारी स्त्रियांचे प्रमाण एक हजार १२० इतके आहे, ही अत्यंत चांगली बाब आहे. जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here