अलिबाग तालुक्यातील श्रीगाव गावात असलेली निटको टाईल्स कंपनीच्या कामगारांवर रातोरात बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंपनी प्रशासनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता प्रवेशद्वारावर नोटीस लावत कंपनीला टाळे ठोकले आहे. कंपनी प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे स्थानिकांसह, राज्यातील आणि परराज्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. निटको कंपनीच्या कामगारांनी कंपनी प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देत कंपनीसमोर धरणे धरले आहे. अलिबाग तालुक्यातील श्रीगाव गावात निटको कंपनीचे मालक विवेक तलवार यांनी 1995 मध्ये 50 स्थानिकांची 86 एकर जागा खरेदी खरेदी केली. या जागेवर 1997 साली निटको कंपनीची स्थापना केली. घरासाठी लागणाऱ्या टाईल्सची निर्मिती कंपनी करते. कंपनी स्थापन झाल्यानंतर स्थानिकांनाही रोजगार मिळाला. स्थानिकांसह कंपनीत 250 स्थायी कामगार तर 50 कंत्राटी कामगार काम करत आहेत. सोमवारी कामगार कंपनीत आले, तेव्हा कंपनी प्रशासनाने लॉक आऊटची नोटीस लावली होती. ती पाहून सर्व कामगारांना धक्का बसला. विशेष म्हणजे रात्रपाळीसाठी कामावर असणाऱ्या पाच कामगारांनाही याची कल्पना नव्हती. कंपनी बंद झाल्याची माहिती कळताच कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे दिले आहे. कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीला टाळे लावले आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असून हा लढा कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कंपनी बंद करण्याआधी कामगारांकडून टाईल्सची निर्मिती करून घेतली आहे. चार महिन्यांपासून कंपनीमध्ये साफसफाईची कामे कामगारांकडून करून घेतली जात होती. तर चार महिन्यांचा पगार दिलेला नसून कामगारांनी आवाज उठविल्यानंतर एक महिन्याचा पगार कामगारांना देण्यात आला आहे. तर उर्वरित पगार अद्यापही दिलेला नाही. कंपनीने टाळे ठोकले असून आमचा पगार आणि देणी कंपनीने त्वरित द्यावी अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे. राज्याच्या कामगार मंत्र्यांनी आमच्या या बेरोजगारीवर तोडगा काढावा अशी मागणी कामगार करत आहेत. अलिबागमधील कंपनीला टाळे ठोकून कंपनीने येथील कामगारांना वाऱ्यावर सोडले असताना गुजरातमधील युनिट सुरू ठेवले आहे. कंपनी फायद्यात असताना कंपनी प्रशासनाने कंपनीला टाळे ठोकण्याचा घाट घातल्याने कामगारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याबाबत कंपनीचे अधिकारी अजोय कुरूप यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
