देशातील पहिल्या नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राचा सिंधुदुर्गात शुभारंभ

0

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवन आनंदी व समृद्ध बनविणे हे कृषी प्रतिष्ठानचे ध्येय आहे. पौष्टिक, सकस व शाश्वत अन्न निर्मिती ही काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीचे तज्ज्ञ डॉ. सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याकरिता कृषी प्रतिष्ठानद्वारे नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. देशातील पहिल्या नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. सामंत यांनी महाविद्यालयाच्या ओरोस येथील प्रक्षेत्रावर भेट देऊन नैसर्गिक शेतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. नैसर्गिक शेती प्रशिक्षण केंद्राच्या फलकाचे अनावरण पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सतीश सावंत, संदेश पारकर, कृषि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे सुधीर सावंत, कर्नल नरेश कुमार उपस्थित होते. प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक शेतीचा मुख्य घटक जीवामृत याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी नैसर्गिक शेतीच्या उपक्रमाला सर्वतोपरी शासन स्तरावर मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी उभारलेला नैसर्गिक शेतीचा उपक्रम स्तुत्य व शेतकरी हिताचा आहे. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी नैसर्गिक शेती महत्वाची आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट अन्नाची निर्मिती होऊ शकते. या जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. हा जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाणे गरजेचे आहे. सुधीर सावंत यांनी आंबा महोत्सव सुरू करून शेतकर्‍यांना आंबा विक्रीसाठी एक नवीन बाजारपेठ उभी केली आहे. रासायनिक शेती करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, देशातील वाढत्या अन्न उत्पादनाची गरज फक्त नैसर्गिक शेतीद्वारेच भागवता येईल. रासायनिक शेतीमुळे जमिन नापीक होते आणि त्यातून विषारी अन्न निर्माण होते. ज्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब असे आजार प्रमाणात वाढले आहेत. कुपोषणाची समस्या देशाला भेडसावत आहे. त्यामुळे आम्ही देशभरात ही चळवळ उभारली आहे. त्यात कोकण आघाडीवर असले पाहिजे. केंद्र सरकारने व राज्य सरकारने याला मंजूरी देऊन शेतकर्‍यांना आशा दिली आहे. तरी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व आमदारांनी या चळवळीला ऊर्जित अवस्थेत आणावे,असे ते म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here