घनकचरा, सांडपाणी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य

0

रत्नागिरी : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या योजनेमध्ये राज्यातील ग्रामपंचायती हागणदारीमुक्‍त झाल्या आहेत. त्याचबरोबर आता सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार असून, यासाठी केंद्र शासनाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना आता कुटुंब आधारित अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)च्या संदर्भाधीन मार्गदर्शक सूचनांमध्ये, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या घटकांचा समावेश केला आहे. यासाठी केंद्र व राज्याचा अर्थसहाय्याचा हिस्सा 60:40 या प्रमाणात आहे. यामध्ये लाभार्थी ग्रामपंचायतीचा हिस्सा निरंक आहे. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना कुटुंबसंख्या आधारित, अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. 150 पर्यंत कुटुंबसंख्या, 300 पर्यंत कुटुंबसंख्या, 500 पर्यंत कुटुंबसंख्या आणि 500 पेक्षा जास्त कुटुंबसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना, अनुक्रमे रु. 7 लक्ष, रु. 12 लक्ष, रु. 15 लक्ष आणि रु. 20 लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्‍त अतिरिक्‍त निधीची आवश्यकता असल्यास, या निधीची तरतूद ग्रामपंचायतीने त्यांच्याकडील इतर उपलब्ध स्त्रोतामधून करणे आवश्यक आहे. या घटकांतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेच्या विहित ठरावासोबत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, यांना अर्ज सादर करावा. तथापि गावामध्ये मंजूर प्रकल्पामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू असल्यास, अशा ग्रामपंचायतीने अर्ज करू नयेत. येथून तो जिल्हास्तरावर पाठवण्यात येणार असून,  जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तद्नंतर प्रशासकीय मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी ग्रामपंचायतींकडे जागा उपलब्ध असली पाहिजे. पाणीपट्टीची वसुली 70 टक्केपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. प्रकल्प कायमस्वरूपी राबवण्यात येईल याचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here