दिव्यांग मुलांच्या मदतीकरिता मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे “वीर शिवाजी” या नाटकाच्या प्रयोगाचे लांजा आणि राजापूर तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे. लांजा आणि राजापूर तालुक्यातील दिव्यांग तसेच गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीकरिता राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने आज लांजा येथील विद्यार्थी रंगमंदिरात, दि. २९ रोजी येथे ओणी येथील नूतन विद्यामंदिरमध्ये, दि. ३० रोजी पाचल येथील सरस्वती माध्यमिक विद्यामंदिरात, तर ३१ जानेवारीला नाटे विद्यामंदिर, नाटे अशा ४ प्रयोगांच्या आयोजन केले आहे. संघाचे सहावे ग्रामीण साहित्य संमेलन घेरा यशवंतगडाच्या पायथ्याशी वसलेल्या नाटे या गावात येत्या १ आणि २ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. या किल्ल्याच्या दुर्दशेकडे सरकारचे लक्ष जावे आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन होण्याकरिता वातावरण निर्मिती व्हावी, हाही हे नाटक सादर करण्याचा उद्देश आहे. मुंबईतील महालक्ष्मी कलामंच निर्मित “वीर शिवाजी” या नाटकाने गेल्या वर्षी गोवा आणि कोकणचा यशस्वी दौरा केला होता. आता पुन्हा एकदा कोकणात प्रयोग केले जाणार आहेत. या नाटकाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा, राजापूर, पाचल, ओणी, नाटे येथील ग्रामीण समित्या मेहनत घेत आहेत.
