कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश गवस यांना जिल्हाध्यक्ष पदावरून तडकाफडकी बाजूूला करत प्रदेश चिटणीसपदी त्यांना बढती देण्यात आली. मात्र, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेल्यामुळे सुरेश गवस यांनी ते पद नाकारले. विशेष म्हणजे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे जिल्हातील राष्ट्रवादीच्या जवळपास 52 प्रमुख पदाधिकार्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. आता येत्या दोन दिवसात पक्षाच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुरेश गवस यांनी दिली. आम्ही राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून सुरुवातीपासून संघटनेत काम केले. मात्र, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून जिल्हाध्यक्ष पदाबाबत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष पदावरून मला तडकाफडकी बाजूला करण्याचा निर्णय घेतल्याने सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत (कुडाळ), उदय भोसले (सावंतवाडी), जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम बर्डे (दोडामार्ग), शिवाजीराव घोगळे (कुडाळ), जिल्हा चिटणीस अशोक पवार, तालुका महिला अध्यक्ष रंजना निर्मल (सावंतवाडी), शहर अध्यक्ष सत्यजीत धारणकर (सावंतवाडी), ओबीसी सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर (कुडाळ), प्रफुल्ल सुद्रिक (कुडाळ), विजय कदम, रामभाऊ सावंत, जिल्हा सचिव सतिश पाटकर, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण (वैभववाडी), संदीप पेडणेकर, बावतीस डिसोजा (वेंगुर्ला)आदींसह जवळपास 52 राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. येत्या दोन दिवसात कुडाळ येथील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. कदाचित मंगळवारी त्या बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचे राजीनामे देण्याचा निणर्र्य होणार असल्याची माहिती श्री. गवस यांनी दिली.
