२०२१ मध्ये जनगणना करण्यात येणार आहे. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. या जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या नेमणुका मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत. त्यामुळे मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत नोटीसही पाठवल्या आहेत. सुट्ट्या रद्द झाल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. तसेच या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निषेध केला आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणीही परिषदेने केली आहे. देशाची एकूण लोकसंख्या जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना केली जाते. आपल्या देशातील १६वी जनगणना ही २०२१ या वर्षात होणार आहे. या जनगणनेसाठीचा पहिला टप्पा येत्या १ मेपासून सुरू होणार आहे. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत हा पहिला टप्पा पार पडेल. यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी, घर यादी तयार करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. शिक्षकांना वर्षात ७६ सुट्ट्या मिळतात, मात्र या कामामुळे ७६ पैकी ३९ सुट्ट्यांना शिक्षकांना मुकावे लागणार आहे. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या या हक्काच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जनगणना अधिकाऱ्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या शिक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक परिषदेने हा निर्णयाचा निषेध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. महापालिका, खासगी शाळआंमधील शिक्षक आणि मुख्याधापकांना मुख्यालय सोडून जाऊ नये अशा सूचना नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यालय सोडून गेल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. कोणत्याही कामासाठी शिक्षकच का नेमावे लागतात. त्यांच्या सुट्ट्यांवर गदा का येते. इतर कर्मचाऱ्यांकडे हे काम सोपवले जात नाही. आम्ही जनगणना अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करू नयेत अशी करणार आहे. या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत बाहेर जावे लागते. तसेच काही शिक्षकांना बोर्डाचे पेपर तपासण्याची जबाबदारीही असते असे महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे मुंबईतील कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले आहे.
