देवळा-सौंदाणे रस्त्यावरील एसटी बस-रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर

0

देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ झालेल्या एस.टी. बस आणि रिक्षाच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला असून ही संख्या आता 26 वर पोहोचली आहे. तर जखमींची संख्या 32 वर पोहोचली आहे. दरम्यान बुधवारी सकाळी पुण्याहून एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व जखमींना बाहेर काढल्यानंतर आता ही मोहीम थांबवण्यात आली आहे. मेशी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी एसटी बसचा टायर फुटून एस.टी.ची अॅपे रिक्षाशी समोरासमोर धडक झाली होती. या भीषण अपघातात दोन्ही वाहने सुमारे सत्तर फूट खोल विहिरीत कोसळली. आधी सात जणांचे कुटुंब प्रवास करत असलेली रिक्षा विहिरीत कोसळली, पाठोपाठ एसटीचे धूड रिक्षावर कोसळले. त्यामुळे रिक्षातील पूर्ण कुटुंब जागीच ठार झाले. कळवण डेपोची एसटी बस मंगळवारी दुपारी एक वाजता धुळे येथून कळवणला जाण्यासाठी निघाली. या बसमध्ये 46 प्रवाशी असल्याचा अंदाज आहे, तर अॅपे रिक्षा देवळ्याहून मालेगावला सात प्रवाशांना घेऊन जात होती. देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ दुपारी पावणेचार वाजता एसटी बस आणि अॅपे रिक्षा यांची समोरासमोर धडक झाली. रस्त्याच्या कडेलाच असलेल्या सुमारे सत्तर फूट खोल विहिरीत आधी ऍपे रिक्षा आणि त्यावर एसटी बस कोसळली. या भीषण अपघाताचे वृत्त कळताच देवळा, कळवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. उमराणे, मेशी या भागातील शेकडो ग्रामस्थही मदतीसाठी धावून आले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here