कोल्हापूर – भारतीय सेनेच्या दिल्ली मुख्यालयाकडून खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जनरल ऑफिसर कमांडिंग, कर्नल ऑफ दी रेजिमेंट(मराठा लाईट इंफंट्री) लेफ्ट. जन. मिस्त्री यांनी संभाजीराजे यांच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत हा सन्मान केला. भारतीय सैन्य दलांचे आणि छत्रपती घराण्याचे शेकडो वर्षांचे घनिष्ठ नाते आहे. ती उज्ज्वल परंपरा जपून पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. राजकीय, सामाजिक जीवनात कितीही व्यस्त असलो तरी, वेळात वेळ काढून मी सैन्य दलांच्या अधिकारी व सैनिकांच्या भेटी घेत असतो. सैन्य दलाच्या अनेक कार्यक्रमांना जात असतो. छत्रपती घराण आणि सैन्याला एकत्र जोडून ते नाते अजून घट्ट कसे करता येईल यासाठी माझे सदैव प्रयत्न असतात. लेफ्ट. जन. मिस्त्री हे आता मराठा लाईट इंफंट्री चे प्रमुख आहेत. यांनीच यावर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व केले होते. त्यांच्याच हस्ते छत्रपती घराण्याचा सदस्य म्हणून सैन्यदलाविषयी देत असलेल्या योगदानाबद्दल होणारा सन्मान माझ्या आयुष्यातील बहुमोल सन्मान आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी म्हंटले आहे.
