मुंबई : पवन शेरावतच्या (11 गुण) जोरदार कामगिरीच्या बळावर प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत बंगळुरू बुल्स संघाने यू मुम्बावर 30-26 असा विजय मिळवला. यू मुम्बाकडून अर्जुन देशवाल (6 गुण) व अभिषेक सिंग (5 गुण) यांनी चांगला खेळ केला; पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. वरळीच्या एनएससीआय येथे पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच चांगली चुरस पाहायला मिळाली. एक-एक गुणासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंचा चांगला कस लागला. यू मुम्बा संघावर एकवेळ सर्वबाद होण्याची वेळ आली मात्र, मुंबईच्या बचावफळीने संघाला अडचणीतून सावरले. तर, बंगळुरू संघाने चांगला खेळ करीत मध्यंतरपर्यंतला 13-11 अशी आघाडी घेतली. बंगळुरू बुल्स संघाकडून पवन सेहरावतने तीन गुण मिळवत चमक दाखवली. त्याला महेंद्रसिंग व सौरभ नांदल यांनी योगदान दिले. यू मुम्बा संघाकडून अर्जुन देशवालने तीन गुण मिळवले. दुसर्या सत्रात यू मुम्बा संघाने पुनरागमन करीत गुणांची कमाई करीत संघाच्या गुणसंख्येत भर घातली. यजमानांच्या चढाईपटू व बचावपटूंनी चांगला खेळ करीत सामन्याच्या 26 व्या मिनिटाला बंगळुरूवर लोण चढवित आघाडी घेतली. सामन्यात एकवेळ यू मुम्बा आघाडीवर होता; पण बंगळुरूच्या सेहरावतने मुंबईकडून सामना हिरावून घेतला. सामना संपण्यास अवघी दीड मिनिटे शिल्लक असताना बंगळुरूने मुंबईवर लोण चढवित 28-25 अशी निर्णायक आघाडी घेतली. संघाने अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत 30-26 असा विजय मिळवला.
