रत्नागिरी: सरकारी कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या इसमास एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा

0

रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि ग्रामसेविकेशी अश्लील वर्तन करणाऱ्या लाकूड व्यावसायिकाला न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा व 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. पर्शराम लक्ष्मण शिंदे (रा. शिवणे, ता संगमेश्वर) असे व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना 26 सप्टेंबर 2014 रोजी घडली होती. ग्रामसेविका नियती योगेश चव्हाण या शिवणे ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करत असताना शिंदे ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने ग्रामसेविकेच्या कक्षात जाऊन त्यांच्याकडे 2012 ते 2014 पर्यंतचे ग्रामपंचायतीच्या बैठकीच्या सहीचे रजिस्टर मागितले. त्यावेळी ग्रामसेविकेने आपण कामात आहोत. तुम्हाला हव्या असलेल्या माहितीचा अर्ज द्या, तुम्हाला माहिती देऊ, असे सांगितले. याचा शिंदे यांना राग आला. त्याने ग्रामसेविकेच्या हातातील सरकारी कामकाजाचे कागदपत्र उडवून “तुझी नोकरी घालवतो, तुला रस्त्यावर आणतो” अशी धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला आणि कार्यालयात गोंधळ घातला. त्याने ग्रामसेविकेशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी ग्रामसेविका चव्हाण यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलीसांनी आरोपी पर्शराम शिंदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक यमगेकर करत होत्या. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचा सत्र न्यायाधीश बिले यांच्या न्यायालयात मंगळवारी निकाल देण्यात आला.आरोपीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा व 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सरकारी पक्षातर्फे अॅड. अनुपमा योगेश ठाकूर यांनी काम पाहिले. खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पिलणकर यांनी काम पाहिले.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here