राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांसह गुहागरकरांची चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत

0

रत्नागिरी : चिपळूणच्या महापुरामुळे झालेल्या परिस्थितीची माहिती मिळताच गुहागरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी काही तासांत यंत्रणा सज्ज केली आणि त्यांच्यासह गुहागरकरांनी चिपळूणच्या आपद्ग्रस्तांना मदत केली. चिपळूणला पूर आला, तेव्हा गुहागरमध्येही भरपूर पाऊस होता. मात्र २००५ चा पूर आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये कसे काम करायचे, हे माहीत असल्यामुळे गरजेच्या कपडे आणि अन्य वस्तूंची यादी तयार करून त्यानुसार नियोजनबद्ध संकलनाचे काम सुरू केले. चिखल, गाळ भरपूर साचणार असल्याने कपडे आणि लोकांना पिण्यासाठी पाण्याची निकड घेऊन सुरवातीला या वस्तू गोळा करण्यासाठी आवाहन केले. त्याला गुहागर, असगोली, अंजनवेल, पालशेतमधून प्रतिसाद मिळाला. पुराचे पाणी ओसरत असल्याचे समजल्यानंतर गुहागर, अंजनवेल आणि आरजीपीपीएलमधून उपलब्ध झालेले पाणी तातडीने चिपळूणला वड नाका येथे पाठविण्यात आले. गुहागर शहरातून संध्याकाळी पाणी आणि कपडे गोळा करण्यासाठी चार संकलन केंद्रे सुरू करण्यात आली. तेथे कपड्यांचे ढीग गोळा झाले. आरजीपीपीएलनेही संकलन केले. त्यानंतर भंडारी भवनात वर्गीकरण करण्यात आले. लहान मुले, पुरुष, स्त्रियांसाठीचे कपडे असे वर्गीकरण राष्ट्रसेविका समितीच्या ४० सेविकांनी केले. एका महिलेसाठी २ साड्या, पुरुषांना २ शर्ट, पॅंट या हिशेबाने ५ हजार लोकांसाठी कपडे संकलित झाले. लगेचच वाटपासाठी चिपळूणला संघ स्वयंसेवक रवाना झाले. गरजूंना त्याचे वितरण केले. चिपळूणमधील मुरादपूर, शंकरवाडी, बहादूरशेख नाका, वडार कॉलनी या ठिकाणी सुमारे २५०० जणांना कपडे वितरण केले. त्यासाठी १० जणांचे पथक कार्यरत होते. शिवाय ज्याला जे कपडे हवे होते, त्यांना ते दिले. प्रत्येकाला वडार कॉलनीत भाकऱ्या, पोळ्या चटणी असे १००० जणांना एकवेळ पुरेल, असे जेवण दिले. त्यानंतर २६ जुलैला चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील वडार कॉलनीतील ३० कुटुंबे, कोळकेवाडी पुनर्वसन वसाहतीतील २० कुटुंबे, खांदाट भोईवाडीतील २५ कुटुंबे, शिगवणवाडीतील २० कुटुंबे, खेर्डी शेंबेकर चाळीतील १० कुटुंबे यांना धान्य किट आणि कपडे पोहोचविण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 31-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here