“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली”; शरद पवारांनी केले उद्धव ठाकरेंचे जाहीर कौतुक

0

मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते, मंत्री उपस्थित होते. या सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर कौतुक करत, राज्यातील संकट काळातही मुख्यमंत्र्यांनी ही हिंमत दाखवली, असे शरद पवार म्हणाले. बीडीडी चाळीचा सगळा परिसर महाराष्ट्राच्या ऐक्याचा आणि सांस्कृतिक ठसा व्यक्त करणारा आहे. येथे कोकणातील, घाटावरचे लोक राहतात, या दोन्ही लोकांना एकसंध करण्याचे काम या परिसरात केले जात आहे, याचा मला आनंद आहे. या चाळींमध्ये काही बदल केले पाहिजेत. अधिक सुविधा दिल्या पाहिजेत. मालकी हक्क दिला पाहिजे. याहीपेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्यामुळे हे या ठिकाणी होऊ शकले आहे, असे कौतुकोद्गार शरद पवार यांनी यावेळी काढले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. एक मोठे अतिवृष्टीचे संकट आले. हजारो घरे पडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरले. होते नव्हते, ते वाहून गेले, खराब झाले. पण एक गोष्ट चांगली आहे की, या संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली, असेही शरद पवार नमूद केले.

हा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग
समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठं पाऊल पडत आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग आहे. हा सगळा परिसर याचा इतिहास नुकताच एका ग्रंथाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला गेला आहे. या परिसरात एक दृष्टीने देशाचाच इतिहास घडला. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते. ज्यांनी या देशातील प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला. त्यांचे देखील या ठिकाणी स्मरण करतो. परिवर्तनाच्या चळवळीत अत्यंत महत्वाचे मार्गदर्शनाचे काम करणारे, प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्यही या परिसरात एकेकाळी होते, अण्णाभाऊ साठेही येथे राहायचे. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचाही संचार या भागात होता आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संबंध महाराष्ट्र जागृत करण्यासंबंधी कार्य करणारे आचार्य अत्रे यांचेही वास्तव्य या परिसरात होते. माझी एकच विनंती आहे, या २०-३० मजली इमारती उभ्या राहतील. पण यामधला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.
दरम्यान, मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल, असे स्वप्न कधी पाहिले नव्हते. आता चाळीचा टॉवर करतोय, पण त्यांनी आपल्याला जे दिले ते ऋण आपण फेडू शकत नाहीत. या चाळीच्या इतिहासाची मूळे खोलवर रुजलेली आहेत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचे घर असायला हवे, तेच आम्ही करतोय, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना नमूद केले

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 02-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here