रत्नागिरी : नाटे येथे शनिवारपासून सहावे ग्रामीण साहित्य संमेलन

0

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे नाटे ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून येत्या १ आणि २ फेब्रुवारी रोजी नाटे (ता. राजापूर) येथे सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. प्रसिद्ध वस्त्रहरण नाटकाचे लेखक आणि ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून माध्यमकर्मी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घुंगुरकाठी या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. राजापूर आणि लांजा तालुक्यांमधील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ गेली पाच वर्षे ग्रामीण भागात साहित्य संमेलनांचे आयोजन करत आहे. त्यानिमित्ताने त्या त्या भागातील संस्कृतीचा आणि विकासाचा जागर व्हावा, अशी त्यामागची कल्पना आहे. पहिले ग्रामीण साहित्य संमेलन तळवडे (ता. लांजा) येथे झाले होते. त्यानंतर पाचल, लांजा, ताम्हाणे आणि कोट याठिकाणी संमेलन साजरे झाले. यावर्षीचे संमेलन सहावे असून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाटे येथील यशवंतगडाच्या पायथ्याशी होणार आहे. नाटे गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यशवंतगड या ऐतिहासिक वास्तूचा अधिकाधिक पर्यटकांना परिचय व्हावा, यासाठी हे संमेलन तेथे घेतले जात असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here