मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात येणारे डोंगर कापण्यासाठी ठेकेदाराने हजारो जिलेटिनच्या कांडय़ांचा वापर करून कशेडी घाटात भूसुरुंगाचे स्फोट केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र हा धमाका इतका भयंकर होता की त्याचे धक्के दोन किलोमीटरच्या परिसराला बसले. भूकंप झाला की काय, असे वाटल्याने ग्रामस्थांनी आपल्या मुला-बाळांसह घराबाहेर अक्षरशः पळ काढला. इतकेच नाही तर 60-70 घरांना उभे-आडवे तडे गेले आहेत. यातून आरसीसीची भक्कम घरेदेखील सुटली नाहीत. साधा मुरुम असतानादेखील ठेकेदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून कशेडी घाटात केलेल्या धमाक्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. पनवेल-इंदापूरदरम्यान महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील झाराप पर्यंतचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कशेडी घाटातही मंगळवारी ठेकेदाराने डोंगर फोडण्यासाठी हजारो जिलेटिनच्या काडय़ा आणि प्रतिबंधित अमोनियाचा वापर केला. प्रचंड स्फोटाच्या हादयाने दोन कि.मी. अंतरावरील चोळई, धामणदिवी, भोगाव येथील 60 ते 70 घरांना तडे गेले. भूकंप झाल्याच्या भीतीने गावकरी घर सोडून बाहेर पळाले. कशेडी घाटातील भूसुरुंग स्फोट असल्याचे उघड होताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यामुळे हादरलेल्या ठेकेदाराने कामगारांसह घाटातून पळ काढला.
