अलिबागमधील शहाबाज गाव ठरतेय जितड्याचे माहेरघर, मत्स्यशेतीतून होतेय भरभराटी

0

शेतीला पूरक असा जोडव्यवसाय करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. अलिबाग तालुक्यातील शहाबाज मधील तरुण शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेत तळी निर्माण करून मत्स्यशेती व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. जिताडा, राहू, कटला या माशांचे उत्पादन येथील शेतकरी घेत असून सधन होऊ लागला आहे. अलिबाग तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला असून याठिकाणी मासेमारी व्यवसाय कोळीबांधव करीत आहे. मात्र अतिवृष्टी, चक्रीवादळ, आधुनिक मासेमारीमुळे कमी झालेले मत्स्य उत्पादन यामुळे मच्छीमारही आर्थिक संकटात आलेला आहे. असे असताना शेतीव्यवसाय करणारे शहाबाज मधील शेतकऱ्यांनी मात्र मत्स्यशेती व्यवसायात आपला जम बसविण्यास सुरुवात झाली आहे. पापलेट, सुरमई, रावस या माशासोबत जिताडा हा मासा खाण्यास चविष्ट आहे. जिताडा मासा हा अलिबागची ओळख आहे. हा मासा मटनापेक्षा महाग असला तरी चविष्ट ग्राहक हा मासा खरेदी करीत असतात. पूर्वी जिताडा माशांच्या शेतीबाबत येथील शेतकरी हा जागृत नव्हता. शेत लागवडी वेळी शेतात येणार हा जिताडा मासा पकडून येथेच्छ मेजवानी करणे याकडे येथील नागरिकांचा कल होता. शेतीला पूरक म्हणून मत्स्यशेती करण्यासाठी शासनाने प्रोत्साहन दिल्यानंतर जिताडा माशांच्या शेतीला जोर धरू लागला आहे. शेती व्यवसायात उत्पन्न कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तळी निर्माण केली. या तळ्यात जिताडा, राहू, कटला यासारख्या माशांची पिल्ले सोडली. माशांना योग्य प्रमाणात खाद्यपदार्थ दिल्यानंतर चार महिन्यात उत्पादन घेण्यास सुरुवात होते. मासळी बाजारात जिताडा माशाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळतो. जिताडा हा पाचशे रुपयांपासून दीड दोन हजारपर्यत विकला जातो. तर कटला, राहू माशांनाही चांगला भाव मिळत आहे. शहाबाज गावातील तरुण शेतकरी हे मत्स्यशेतीकडे वळले असून शेतात अनेक ठिकाणी शेततळी मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. मत्स्यशेतीमुळे येथील शेतकरी हे सधन झाले आहेत. अलिबागमध्ये येणारे पर्यटकही जिताडा माश्याची चव चाखत असून शेतकऱ्यांनी शेतात जाळी टाकून ताजे मासे पकडण्याचा आनंदही लुटत आहे. शहाबाज परिसर हे जितड्याचे माहेरघर होत असताना शेतकऱ्यांना मत्स्यशेतीतील तांत्रिक बाबीचे मार्गदर्शन मिळण्यासाठी मत्स्यविभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्पादन वाढीस अजून चालना मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here