बारावीच्या निकालाबाबत आक्षेप असल्यास येथे संपर्क करा, शिक्षणमंत्र्यांचं आवाहन

0

मुंबई : दहावीनंतर बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून राज्य मंडळाचा २०२१ चा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात ८.९७ टक्क्यांनी वाढ झाली. त्यात विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के, कला शाखेचा ९९.८३ टक्के , वाणिज्य शाखेचा ९९.९१ टक्के तर एमसीव्हीसीचा निकाल ९८.८० टक्के लागला. राज्यातील ४६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. नऊ विभागीय मंडळात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला. या निकालाबाबत विद्यार्थी किंवा पालकांना आक्षेप असल्यास विभागीय स्तरावर संपर्क करण्याचं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांअंतर्गत घेतल्या जाणा-या बारावी परीक्षेचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी जाहीर केला. यंदा कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे यंदा दहावी,अकरावीचे गुण आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल प्रसिध्द करण्यात आला. त्यामुळेच, या निकालाबाबत विद्यार्थी अथवा पालकांना आक्षेप असल्यास तक्रार नोंदविण्याची मुभा देण्यात आली आहे. स्वत: शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करुन संबंधित विभागीय कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यातील १३ लाख १९ हजार ७५४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४ हजार ७८९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बारावीतील मुलींचा निकाल ९९.७३ टक्के तर मुलांचा निकाल ९९.५४ टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींचीच आघाडी आहे.तसेच एकूण १६० विषयांपैकी ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला.
बारावी निकालाची वैशिष्ट्ये

  • राज्यातील ६ हजार ५४२ शाळांचा निकाल १०० टक्के – एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के नाही
  • १२ विद्यार्थी ३५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण
  • ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांना ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण
  • १ हजार ३७२ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण
  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५९ टक्के
  • विभागीय मंडळाचा निकाल
    मंडळाचे नाव निकालाची टक्केवारी
    पुणे ९९.७५
    नागपूर ९९.६२
    औरंगाबाद ९९.३४
    मुंबई ९९.७९
    कोल्हापूर ९९.६७
    अमरावती ९९.३७
    नाशिक ९९.६१
    लातूर ९९.६५
    कोकण ९९.८१
  • शाखा निहाय निकालाची तुलनात्मक टक्केवारी
    शाखा २०२० चा निकाल २०२१ चा निकाल तुलनात्मक टक्केवारी
    विज्ञान ९६.९३ ९९.४५ २.५२ जास्त
    कला ८२.६३ ९९.८३ १७.२०जास्त
    वाणिज्य ९१.२७ ९९.९१ ८.६४ जास्त
    एमसीव्हीसी ८६.०७ ९८.८० १२.७३ जास्त

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 04-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here