दिल्लीतल्या जामिया भागामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काढलेल्या एका मोर्चात एका व्यक्तीने गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या माणसाला ताब्यात घेतलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एका युवकाला गोळी लागली असून तो जामियाचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची पोलीस चौकशी करत आहेत असं एएनआयने स्पष्ट केलं आहे. या विभागाचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले, एका व्यक्तीने पिस्तुल दाखवत गोळीबार केला आणि त्यात एक तरुण जखमी झाला आहे. बिस्वाल म्हणाले, ही व्यक्ती गर्दीमध्येच होती आणि त्याने विद्यार्थ्यांच्या दिशेन पिस्तुल रोखले. एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तो आता सुरक्षित आहे. हा जखमी विद्यार्थी जामिया विद्यापिठाचा विद्यार्थी आहे.
