रत्नागिरी दिनांक 31 : चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पूर्ण जग धास्तीत आहे. चीनमधील Nantog प्रांतात Nantog विद्यापीठात खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्या तिथे सुरक्षित असून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या विद्यार्थिनीपैकी सादिया बशीर मुजावर तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला, असता ही माहिती त्यांनी दिली. खेडमधील सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदूले आणि सादिया बशीर मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये राहत आहेत. सध्या त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी आहे. या सुट्ट्या 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही. या तीघीजणी त्यामुळे घरातच आहेत. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबत दूरध्वनीवर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास संपर्क केला व त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी किमान एक महिना वाढवावा व त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने चीन मधील भारतीय दूतावासासोबत पत्रव्यवहार आपण करू व लवकरात लवकर त्यांना भारतात आणू असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तिघींना सांगून आश्वस्त केले आहे.
