‘फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत आघाडी सरकारने द्यावी’

0

रत्नागिरी : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

श्री. पटवर्धन यांनी याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेल्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजमधून संकटग्रस्तांच्या वाट्याला फार कमी मदत येणार आहे. आघाडी सरकारने जाहीर केलेल्या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी, तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. सात हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या संकटग्रस्तांना तातडीने रोख मदतीची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा जो शासन आदेश काढला होता, त्यानुसार मदत देणार असल्याचे आघाडी सरकारने जाहीर केले होते. मात्र या मदतीमध्येही आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसत आहे. फडणवीस सरकारने नुकसानीचे पंचनामे होण्याआधी पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन ५ हजार रुपयांची रोख मदत पोहोचविली होती. तसेच संकटग्रस्तांच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा केले होते. अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्यांची घरे राहण्यायोग्य राहिली नव्हती, अशा लोकांना शहरी भागात ३६ हजार तर ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी घरभाडे म्हणून दिले होते. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, अशांना ९५ हजार १०० रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते, अशी भरघोस मदत आघाडी सरकारने द्यावी, असेही श्री. पटवर्धन यांनी पत्रकात नमूद केले आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीपेक्षा कमी मदत आघाडी सरकारने दिली आहे. जाहीर केलेल्या मदतीच्या मोठ्या आकड्यांचे ढोल वाजवण्याऐवजी आघाडी सरकारने मदत पोहोचविण्याची प्रक्रिया गतिमान करावी.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:02 PM 05-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here