शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. याचा काही भाग प्रसिद्ध झाला असून उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली आहेत. तुम्ही अॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? असा प्रश्न संजय राऊतांनी ठाकरेंना विचारला होता. यावर त्यांनी ठाकरे शैलीत बेधडक उत्तर दिलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन असं वचन दिलं होतं. हे वचन पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाण्याची तयारी केली होती, असं ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर सडेतोड उत्तरं दिली आहेत. शरद पवारांसोबतचा अनुभव, महाविकास आघाडीचं सरकार चालवण्याचा अनुभव, सीएए, सरकारचा पुढचा प्लॅन, राम मंदिर अशा अनेक विषयांवर त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या मुलाखतीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
