अजित पवार पुण्यातील व्यापाऱ्यांना सूट देणार ? उद्याच्या बैठकीत होणार निर्णय

0

पुणे : राज्यात निर्बंध शिथिल न झालेल्या १४ जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. परंतु पॉझिटिव्हिटी रेट ३ च्या आत असल्याने पुणे व्यापारी वर्गाकडून दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी होत आहे. त्या संदर्भात व्यापाऱ्यांनी घंटानाद आंदोलनही केले होते. त्यानंतर दोन दिवस शहरातील व्यापारी सायंकाळपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात ठाम होते. मात्र आता चार नंतर दुकने उघडी ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील शनिवारी बैठकीत व्यापाऱ्यांची मागणी ठेवण्यात येईल, असे महापौर आणि पोलिस आयुक्तांनी सांगितले.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. निर्णय होण्याची प्रतीक्षा असून सोमवापर्यंत (९ ऑगस्ट) दुकाने चारनंतर उघडी ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला असल्याची माहिती फत्तेचंद रांका यांनी दिली आहे.

मुख्यत: सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची प्रशासनाकडे पुणे व्यापारी महासंघाने मागणी केली आहे. परंतु, त्यांच्या मागणीला अद्याप यश आले नाही. एकीकडे व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, तर दुसरीकडे प्रशासनही वेळेत सूट द्यायला तयार नाही. त्यामुळे येत्या काळात व्यापारी आणि प्रशासन यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता होती. परंतु व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दोन दिवसाची मुदत दिली आहे.

राज्यातील २२ जिल्ह्य़ांमधील र्निबध शिथिल करण्यात आले असून तेथे दुकानांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मात्र, करोनाबाधितांची संख्या कमी असतानाही प्रशासनाने पुण्यातील दुकानांना वेळ वाढवून न दिल्याने व्यापाऱ्यांनी बुधवारपासून शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवली होती.

पोलिसांशी हुज्जत नको

दुपारी चारनंतर उघडय़ा असलेल्या दुकानांची छायाचित्रे टिपली जात असताना पोलिसांशी हुज्जत घालू नये, असे आवाहन फत्तेचंद रांका यांनी व्यापाऱ्यांना केले. ‘पोलीस, महापालिका अधिकारी हे त्यांचे काम करीत आहेत. त्यांच्याशी वाद घालू नका. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणू नका. शांतपणे दुकाने उघडी ठेवा. शॉप अ‍ॅक्ट परवाना देऊ नका’, अशा सूचना रांका यांनी केल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here