रिफायनरीच्या समर्थकांना दहशतीचा अनुभव आल्यास तक्रार करण्याचे आवाहन

0

रत्नागिरी : कोकणच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना काहीजण धमक्या देत आहेत. समर्थन करणाऱ्या कोणाही व्यक्तीला अशा दहशतीचा अनुभव आल्यास त्याने तत्काळ स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करावी. समर्थन करणाऱ्या सर्व संघटना आणि आपल्या सोबतची वकील मंडळी त्यांच्या सोबत तातडीने उभे राहतील, अशी ग्वाही रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार यांच्यासह अन्य रिफायनरी समर्थक संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राजापूर तालुक्यातील रिफायनरी समर्थकांना धमक्या दिल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरी समन्वय समिती अध्यक्ष अॅड. सुतार, बारसू-गोवळ-शिवणे-दशकोशी रिफायनरी समर्थक समिती अध्यक्ष हनिफ काझी, नाटे-सोलगाव-देवाचेगोठणे दशकोशी समर्थक समितीचे डॉ. सुनील राणे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कोकणात उपलब्ध होऊ पाहणाऱ्या रोजगाराकरिता स्थानिक युवक एकवटत असता दहशत माजवून त्यांना रिफायनरी समर्थनापासून परावृत्त करण्यासाठी काही समाजकंटक वेगवेगळ्या दहशतीचा मार्ग अवलंबत आहेत. विचारांची लढाई विचारांनी करण्याची कुवत नसली की दहशतीचा आधार घ्यावा लागतो. गोवळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत नुकताच असा अनुभव आल्यानंतर राजापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार यांनी रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष या नात्याने पुढाकार घेऊन राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास संबंधितांस मदत केली आहे. समर्थकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा यापुढे अशा पद्धतीने कायदेशीर इलाज केला जाईल, याची सर्व समर्थकांनी खात्री बाळगावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वेगवेगळ्या व्हॉट्स अॅप गुपवर प्रकल्पाबाबत नाहक गैरसमज पसवणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या अथवा अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या मेसेजेसचे क्रीन शॉट घेऊन तसेच कोणत्याही स्वरूपाच्या दहशतीचा मार्ग अवलंबणाऱ्या सर्व विरोधकांची एक यादी तयार करावी, त्याचे संकलन करून त्याची माहिती आमच्यापाशी जमा करावी. अशा सर्व संबंधित व्यक्तींची माहिती सरकार तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येईल, त्यांना प्रकल्पातील नोकऱ्या अथवा व्यवसायात समाविष्ट करू नये, अशा स्वरूपाचे निवेदन सरकार आणि प्रकल्प अधिकाऱ्यांकडे समितीमार्पत करण्यात येईल, असेही या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. प्रकल्पाबाबत योग्य ती माहिती हवी असल्यास तसेच प्रकल्पाबाबत चर्चा करण्यास समितीची दारे सर्वांकरिता नेहमीच खुली राहतील. मात्र प्रकल्पाची कोणतीही बाजू ऐकून न घेता नाहक बदनामी करण्याच्या षड्यंत्रात सामील झालेल्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रकल्पाचा कोणताही लाभ मिळू नये, याकडे समिती कटाक्षाने लक्ष पुरवेल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here