जगातील सगळ्या पालिका सेनेच्या ताब्यात नाहीत, मुंबईत पाणी तुंबण्यावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना चिमटा

0

मुंबई : कोरोनाचे संकट असतानाच मुंबईवर नैसर्गिक आपत्ती येत आहे. प्रचंड पाऊस, दरडीही कोसळत आहेत. जगभरात पूर येत आहेत. नियोजन करून वसविलेल्या बीजिंगची महापालिका काही शिवसेनेच्या ताब्यात नाही. देशभरात जिथे जिथे पूर आले असतील, त्या महापालिकाही आमच्या ताब्यात नाहीत. तिथेही पूर आला. त्याला जबाबदार कोण? असे तिकडचे लोक विचारत असतीलच ना? असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. तर, काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी स्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता दिली, तर काही ठिकाणी दिली नाही. याचा अर्थ असा नाही की ते कायम बंद राहील. दुकानांच्या वेळांत शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचे भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिथे-जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही, तिथल्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी संयम सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. पालिका कर्मचाऱ्यांनाही जीव आहे. त्यांनाही कुटुंब आहे. पण तरीही कठीण काळात पालिकेने केलेले काम अद्वितीय आहे. मुंबई मॉडेलची जगानेही दखल घेतली. हे आपण करून दाखविले आहे. सर्व जण घरी असताना पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर होते. ते होते म्हणून आपण रस्त्यावर येऊ शकतो हे त्यांचे आपल्यावर ऋण आहे. संकट फार मोठे होते, अजूनही ते गेलेले नाही, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

जबाबदारीचे भान ठेवूनच लोकलबाबत निर्णय
जेथे निर्बंधामध्ये शिथिलता देणे शक्य होते तिथे तसा निर्णय घेतला. याचा अर्थ कोणी लाडका किंवा कोणी दुश्मन असा होत नाही. सर्वांच्या जीवाची काळजी आहे, म्हणूनच अशा गोष्टी कराव्या लागतात. लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. पण, जबाबदारीचे भान ठेवूनच निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:19 PM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here