महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सगळे निर्णय अजित पवारच घेत आहेत. ह्या सरकारच्या स्थापने पासून अजित पवारच सगळे निर्णय घेताना दिसतायत. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पेक्षा जास्त व नियोजनबद्ध काम करतायत. मुख्यमंत्र्याला सुट्टीवरच राहू दे नाही तरी गोट्या खेळणाराच मुख्यमंत्री आहे, असं म्हणत राणे यांनी लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री शुक्रवार पासून तीन दिवसांसाठी सहकुटुंब महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. शिवसेना आमदाराच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने ते महाबळेश्वरला जात आहेत. यावरुन राणे यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्याला सुट्टीवरच राहू दे नाही तरी गोट्या खेळणाराच मुख्यमंत्री आहे, असं ते म्हणाले आहेत. मी 1995 पासून ते 2019 पर्यंत 6 मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही. जवळपास 3 महिने झाले आणि उद्धव ठाकरे 3 दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की ह्यांना सुट्टी घ्यावी लागली. झेपत नसेल तर खुर्ची खाली करा, असंही राणे म्हणाले आहेत.
