वाशीच्या मार्केटमध्ये हापूसचे आगमन; एक पेटी तब्बल १० हजाराला

0

वाशीतील घाऊक फळ बाजारात गुरुवारी कोकणातील हापूस आंब्याचे आगमन झाले. आंब्याच्या पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला. अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे यंदाचा हापूस बाजारात उशिरा दाखल झाला आहे. गतवर्षी हापूस आंबा नोव्हेंबर अखेरीस बाजारात दाखल झाला होता. यावर्षी हापूसला जानेवारी महिना उजाडला. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील बाजारपेठेत हापूस आंबा दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीत सध्या हापूस आंबा प्रतिडझन २८०० ते ३००० रुपयाला विकला जात आहे. यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये येणारा आंब्याचा मोहोर आलाच नाही. त्यानंतर आवश्यक ती थंडी पडली नाही. त्यामुळे आंब्याला मोहोर धरला नाही. दिवाळीनंतरही पाऊस थांबल्यावर डिसेंबरच्या सुरुवातीला धरलेला मोहोर काही शेतकऱ्यांनी टिकवून ठेवला. त्यातून लागलेले आंबे आत्ता बाजारात आले आहेत. मात्र, हापूस बाजारात आला तरी तो महाग आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पुढील महिनाभर हा दर असाच कायम असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here