सिंधुदुर्गनगरी : कृषी पत पुरवठांतर्गत खरीप पीक कर्ज, पतपुरवठा 2019 अंतर्गत चालू वर्षासाठी शेतकर्यांना शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापोटी आतापर्यंत 50 टक्के एवढे कर्ज वाटप झाले आहे. यात 18 हजार 592 शेतकर्यांना 135 कोटी 60 लाख रुपये एवढे पीक कर्जाचे वाटप विविध बँकांमार्फत करण्यात आले असून उर्वरित दोन महिन्यांमध्ये एकूण 271 कोटी 12 लाख एवढा कर्ज पुरवठा होऊन 100 टक्के उद्दिष्टपूर्ती होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागाचे जिल्हा समन्वयक अरुण नातू यांनी दिली. शासनाकडून आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेतकर्यांनी शेती करावी आणि शेतीचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने शासनाच्या पीक कर्ज योजनेंतर्गत शेतकर्यांना विविध बँकांमार्फत तसेच विकास सोसायट्यांमार्फत अल्पमुदतीचे पीक कर्ज, पतपुरवठा केला जातो. यासाठी विकास सोसायटीकडे शेतकर्यांची सभासद नोंदणी असणे आवश्यक आहे. गतवर्षी 42 हजार 550 शेतकर्यांना 249 कोटी 10 लाख 3 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. चालू वर्षासाठी बँकांना 271 कोटी 12 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 18 हजार 592 शेतकर्यांना बँकांमार्फत 135 कोटी 60 लाख रूपये एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला 94 कोटी 17 लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून बँकेने त्यापैकी 14 हजार शेतकर्यांना 65 कोटी 90 लाख रूपये पिक कर्ज वितरित केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना 155 कोटी 57 लाखाचे उद्दिष्ट असून बँकांनी त्यापैकी 3 हजार 690 शेतकर्यांना 58 कोटी 10 लाख एवढे पीक कर्ज वितरित केले आहे. ग्रामीण बँकांना 8 कोटी 41 लाखांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 753 शेतकर्यांना 7 कोटी 50 लाख एवढे पीक कर्ज वितरित केले आहे. तर इतर बँकांना 12 कोटी 97 लाखांचे उद्दिष्ट असून बँकांनी 149 शेतकर्यांना 4 कोटी 10 लाख एवढे पीक कर्ज वितरित केले आहे. हे पीक कर्ज अल्प मुदतीचे असून कर्ज वितरणासाठी सप्टेंबर अखेर पर्यंत मुदत असल्याची माहिती कृषी अधीक्षक विभागाकडून देण्यात आली.
