रत्नागिरी : बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी

0

वाजवी वेतनवाढ मिळावी आणि सेवाशर्तींमध्ये सुधारणा कराव्यात, या मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप रत्नागिरी जिल्ह्यात पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला. आज आणि उद्या (दि. १ फेब्रुवारी) असा दोन दिवसांच्या संपाचा आजचा पहिला दिवस होता. बँकिंग उद्योगातील शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या सर्व नऊ संघटनांनी या संपामध्ये भाग घेतला होता. देशभरात सुमारे १० लाख तर महाराष्ट्रात सुमारे ४० हजार बँक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले होते. गेले २७ महिने प्रलंबित असलेला बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा अकरावा द्विपक्ष करार त्वरित अमलात आणावा, ही प्रमुख मागणी या संपात आयबीएकडे करण्यात आली आहे. याबाबत काल झालेल्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या. पुन्हा एकदा असमाधानकारक वेतनवाढीचा प्रस्ताव आयबीएने दिला आहे. त्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी आज संप केला. वेतनवाढीच्या मागणीबरोबरच नवीन पेन्शन योजना रद्द करावी, सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना चालू करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, पेन्शन अद्ययावत करावी, फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा करावी, समान कामाचे समान वेतन या आणि इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या मान्य करायला आयबीए तयार नाही. या दोन दिवसांच्या संपानंतर आयबीएने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ११ ते १३ मार्च तीन दिवस तसेच १ एप्रिलपासून बेमुदत संप करण्यात येईल, असे संघटना प्रतिनिधींनी जाहीर केले. रत्नागिरीत संपकरी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सकाळी स्वातंत्र्यलक्ष्मी चौकात बँक ऑफ महाराष्ट्रसमोर एकत्रित येऊन जोरदार निदर्शने केली. निदर्शनांचे नेतृत्व राजेंद्र गडवी, विनोद आठवले, विनोद कदम, विश्वनाथ आडारकर आणि संतोष कुलकर्णी यांनी केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here