रत्नागिरी : ज्येष्ठ करसल्लागार बाळासाहेब वैद्य यांचे निधन

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी जिल्हा व विभाग संघचालक तसेच ज्येष्ठ करसल्लागार पांडुरंग जगन्नाथ तथा बाळासाहेब वैद्य यांचे आज (दि. ३१ जानेवारी) सकाळी रत्नागिरीत निधन झाले. रत्नागिरीमध्ये वैद्य काका या नावाने ते अनेक कुटुंबांमध्ये ते परिचित होते. ठाण्यासारख्या मोठ्या शहरातून ते १९५० साली रत्नागिरीसारख्या अतिशय छोट्या शहरात आले आणि त्यांनी करसल्लागार म्हणून आपला व्यवसाय सुरू केला. व्यवसायामध्ये आपल्या मृदु स्वभावाने वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांशी संबंध जोडून त्यांनी चांगला जम बसविला. पक्षकार आणि सल्लागारांमध्ये अतिशय कौटुंबिक नाते वैद्यकाकांनी निर्माण केले होते. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. रत्नागिरीबरोबरच कोल्हापूर येथेही त्यांचे पक्षकार होते. त्या सर्व पक्षकारांशी तसेच कौटुंबिक संबंध कायम होते. व्यवसाय करत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामही आत्मीयतेने केले. काही कालावधीनंतर ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा एकत्रित जिल्ह्यांचे जिल्हा संघचालक नियुक्त झाले. आपल्या व्यावसायिक प्रवासातून संघाचाही त्यांनी जिल्हाभर प्रसार केला. अनेक स्वयंसेवक जोडले. संघ विस्ताराचे खूप कामही त्यांच्या अनुभवातून पार पडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या स्वयंसेवक बंधूंना त्यांच्या घरामध्ये खरोखरच आपुलकीचे आणि कौटुंबिक जिव्हाळ्याची प्रचिती येत असे. त्यांच्या पक्षकारांनाही तोच अनुभव होता. पक्षकार किंवा स्वयंसेवक या सर्वांच्या कुटुंबीयांमध्ये त्यांचे आपुलकीचे संबंध जोडले होते. त्यांच्या या गुणांची दखल घेऊन संघाने त्यांना महाराष्ट्राच्या डॉक्टर हेडगेवार समितीचे प्रथम अध्यक्ष म्हणून निवडले होते. संघाची सेवाकार्ये ज्या समितीमार्फत होतात, त्या राष्ट्रीय सेवा समिती या न्यासाचीसुद्धा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. सामाजिक कार्यात असूनही त्यांना संगीताची खूप आवड होती. संघाच्या गीतांबरोबरच भावगीत आणि नाट्यगीत ते उत्तमरीत्या म्हणत असत. ते उत्तम प्रकारे बुद्धिबळ खेळत असत. सर्वांनी स्वतःच्या आवडीच्या कला जोपासाव्यात, असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या निधनाने रत्नागिरीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आज अनंतात विलीन झाले, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here