रत्नागिरीतील काजू उत्पादन संकटात सापडले आहे. वाढलेला पावसाचा हंगाम आणि बदलते वातावरण याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील काजू बागांवर दिसू लागला आहे. बुरशीमुळे फांदीमर या रोगाची लागण झाली आहे. टिमारिक्टो व फुलकिडेचा आढळ होत असल्यामुळे नवीन पालवी पुर्णतः सुकली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल अशी भीती काजू बागायतदारांनी व्यक्त केली आहे. बदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील आंबा, काजू उत्पादनावर होत आहे. थंडी उशिरा सुरु झाल्यामुळे आंब्याबरोबर काजूला येणारा मोहोर लांबला. जानेवारी महिन्यात काही ठिकाणी बागा मोहोरलेल्या पाहायला मिळत आहे, परंतु या वातावरणामुळे काजूवर येणाऱ्या पालवीवर बुरशीजन्य रोगांचा अॅटॅक होत आहे. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओले काजूगर बाजारात विकण्यासाठी दाखल होतात. यंदा जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात ओल्या काजुगरांची विक्री सुरु झाली. तीही एखाददुसऱ्या स्टॉलवर पाहायला मिळते. उत्पादनच कमी असल्यामुळे किलोला २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपये असा सोन्याचा दर मिळत आहे. वीस रुपयांना तिन काजूगर विकले जात असून खवय्यांची पंचाईत झाली आहे.
