भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चौथा टी20 सामना येथे पार पडला आहे. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर घेण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी 1 बाद 13 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम सिफर्टने 8 आणि कॉलिन मुन्रोने 5 धावा केल्या. तर रॉस टेलर शुन्य धावेवर नाबाद राहिला. या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 14 धावांचे आव्हान होते. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने फलंदाजी केली. यावेळी भारताकडून केएल राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे भारताला शेवटच्या चार चेंडूत 4 धावांची गरज होती. पण तिसऱ्या चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या होत्या. भारताकडून मनिष पांडेने नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुलने 39 धावांची छोटेखानी खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोधीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो(64) आणि टीम सिफर्टने(57) अर्धशतकी खेळी केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
