रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरातील स्वा. सावरकर नाट्यगृहातील पंख्याचे पाते तुटल्याची घटना घडली असतानाच, सोमवारी जिल्हाधिका-यांच्या केबीनजवळ असणाच्या अभ्यागत कक्षातील भितींवरील पंख्याची पाती तुटून उडाल्याने एका अभ्यागताला किरकोळ दुखापत झाली. आठ-दहा दिवसापूर्वी नाट्यगृहात नाटक सुरु असताना अचानक एका फॅनचे पाते तुटले. हे तुटलेले पाते मोकळ्या जागेत पडल्याने कुणाला दुखापत झाली नव्हती. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या केबीन बाहेरील अभ्यागत कक्षामध्ये प्रसाद राऊत हे जिल्हाधिका-यांशी भेटण्यासाठी प्रतीक्षा करीत बसले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या अभ्यागतकक्षातीलभितींवर लावलेल्या दोन पंख्यांपैकी एका पंख्यांचा मोठा आवाज होऊन फायबरचे पाते तुटले. त्यामुळे पंख्यावरील जाळीही सटकली. पंख्याच्या फायबर पात्यांचे त्यामुळे तुकडे झाले. यातील उडालेला एक तुकडा प्रसाद राऊत यांच्या डोक्याला लागला. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेची माहिती जिल्हाधिका-यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर येऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला व डॉक्टरांना बोलावून घेतले.
