“मुख्यमंत्री उदासीन असल्याने शिक्षणक्षेत्राचा प्रवास उलट्या दिशेने…”

0

मुंबई : राज्य सरकारने अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर मोठा निकाल देताना हायकोर्टाने राज्य सरकारला दणका दिला. अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला. तसेच दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सो़डलं आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार उदासीन असल्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राचा प्रवास उलट्या दिशेने सुरू झाल्याचं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपाचे मुख्यप्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “ठाकरे सरकारमध्येच शिक्षण सम्राट बसल्याने शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे हित खुंटीवर टांगले असून सातत्याने या सम्राटाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. शाळा सुरू करण्यापासून परीक्षांपर्यंत आणि प्रवेशापासून शिकवण्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर न्यायालयाने चपराक लगावल्याखेरील ठाकरे सरकारच्या शिक्षण खात्याचा गाडा पुढे सरकतच नाही. दहावी-बारावी परीक्षांचा घोळ सरकारच्या धोरणलकव्यामुळेच वाढल्यानंतर सीईटीबाबतही ठाकरे सरकार न्यायालयाच्या निकालातूनच सुटकेचा मार्ग शोधत होते” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

“सीईटीचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेवर चाचपडणे सुरू झाल्याने अकरावीच्या शैक्षणिक वर्षाचीही वाताहत होण्याची भीती आहे, शिक्षण खात्याच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार उदासीन असल्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राचा प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला असून विद्यार्थी-पालक, हवालदील आणि सरकार दिशाहीन असे चित्र राज्यात निर्माण झाले आहे शिक्षणसंस्थाचालकांच्या हितासाठी तत्परतेने हालचाली करणारे सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे साफ दुर्लक्ष करत असून अकरावी प्रवेशातील दिरंगाईतून हे स्पष्ट झाले आहे” असं देखील केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 11-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here