पंढरपूर-माळशिरस मार्गावर वेळापुरच्या पिसेवाडी पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एर्टिगा कार (MH -13 CG 5566) आणि ट्रक (MH-09 BC- 2099) यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे. कार वेळापूरकडून माळशिरसच्या दिशेने निघाली होती. हा अपघात इतका भीषण होता की सहा जण जागीच ठार झाले. तर इतर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. वैराग तालुका बार्शीचे फलफले कुटुंब जेजुरीला देवदर्शनासाठी निघाले होते. फलफले हे देवेन्द्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरोग्य विभाग सांभाळणारे ओमप्रकाश शेटे यांचे दोन मेहुणे, त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा असे सर्वजण या अपघातात मृत्युमुखी पडले. अपघातातील मृतांची नावे शिवराज नागेश फलफले वय (38), दिनानाथ उर्फ बाबासो नागेश फलफले (34), वनिता शिवराज फलफले (30), उत्कर्ष शिवराज फलफले (9), सहयाद्री बाबासो फलफले (6), पार्वती महादेव फलफले (80) अशी असून हे सर्व वैराग, तालुका माढा इथले रहिवासी आहेत. तर अपघातातील गंभीर जखमींची नावे पुजा दिनानाथ उर्फ बाबासो फलफले (28), उत्कर्षा शिवराज फलफले (11) अशी आहेत.
