‘लोटे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करा’

0

चिपळूण : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीसाठी चिपळूणहून पाणीपुरवठा केला जातो. याच बरोबर परिसरातील बारा गावांना येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, महापुराला पंधरा दिवस उलटले तरी लोटे परिसरात अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. तो तत्काळ सुरळीत न झाल्यास २५ हजार ग्रामस्थांसह एमआयडीसी विरोधात आंदोलन करू, असा इशारा आवाशीचे सरपंच व लोटे उद्योजक संघटनेचे सचिव अॅड. राज आंब्रे यांनी दिला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीलगत असणारी लोटे, परशुराम, धामणदेवी, आवाशी, गुणदे, असगणी, कोतवली, सोनगाव, घाणेखंट या गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. गेले अठरा दिवस येथे पाणीप्रश्न निर्माण झाला असून वालोपे येथील पंप हाऊसमधून २५ एमएलडी पाणी लोटे येथे पाठविले जाते. त्यातील १२ एमएलडी पाणी उद्योगासाठी तर १२ एमएलडी पाणी परिसरातील गावांना दिले जाते. मात्र, चिपळुणात आलेल्या महापुरानंतर हा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. लोटे औद्योगिक वसाहत व परिसरातील नाले प्रदूषित झाले आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन एमआयडीसीने तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी होत आहे. याबाबत आंब्रे यांनी जिल्हाधिकारी पाटील व एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जर या बाबत तत्काळ कार्यवाही झाली नाही तर लोटे परिसरातील पंचवीस हजार ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा ॲड. आंब्रे यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 12-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here