“घोषणाबहाद्दर विजय वड्डेटीवार यांनी राजीनामा द्यावा”

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भाजपकडून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. वड्डेटीवारांनी या घोषणांच्या नावाखाली आपल्या तोंडाची फक्त वाफ केली, अशी टीकाही करण्यात आली आहे.

महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या संस्थेचे वाट्टोळे केले. लोकसंखेने सर्वाधिक असणारा व विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी भटका विमुक्त समाज महाराष्ट्रात ५२ टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त वापरण्याचे राजकारणे केले. या समाजासाठी त्यांनी काहीही केलं तर नाहीच ऊलट काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात वसंतरावनाईक भटके विमुक्त महामंडळ तर यांनी दाखवायलाही ठेवले नव्हत, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. विजय वड्डेटीवार यांना लिहिलेल्या एका पत्रात गोपीचंद पडळकर यांनी, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

यासर्वांवर उपाय म्हणून मा. देवेंद्र फडणवीसांनी महाज्योतीची स्थापना करून तातडीने ३८० कोटींचा निधीही मंजूर केला. पण आता ठाकरे सरकारच्या कार्यकाळातले सध्याचे महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचे वाट्टोळे केले आहे, असा आरोप पडळकरांनी केला. ओबीसी, मदत आणि पुर्नवसन आणि चंद्रपूरचं पालकमंत्रीपद अशे तीन-तीन पदं भूषवूणही विजय वडेट्टीवारांना महाज्योतीचं पद कशाला मिरवायचंय? आणि नागपूर पासून १५० किलोमीटर दूर असणाऱ्या गोंदीया जिल्ह्यातला अधिकारी प्रदीप डांगेला महाज्योताचा अतिरिक्त कार्यभार नेमका दिलाय का? आणि कशासाठी, असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

वड्डेटीवारांनी दोन वर्षात साधा फलकही महाज्योतीचा ॲाफिसला लावता आला नव्हता. पहिले आठ महिने अधिकाऱ्यांना खुर्च्याही देता आल्या नाही. ओबीसी बांधवावर फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा अन् प्रत्यक्षात मात्र ओबीसी भटक्या विमुक्तांच्या तोंडाला फक्त पाने पुसायची, एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान, १० हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ, यूपीएसीच्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊ, उच्च शिक्षणासाठी ३१ हजाराची फेलोशिप देऊ, ओबीसींसाठी ७२ वसतिगृह उभारू, नीट-सीईटीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देऊ, यूपीएससीच्या मुख्य परीक्षा पास झालेल्यांना दिल्ली मुलाखतीसाठी २५ हजार देऊ, नाशिक-औरंगाबादमध्ये उपविभागीय कार्यालय उभारू, महाज्योतीच्या स्वतंत्र कार्यालयासाठी ६० लाख रू देऊ. इतकेच नाहीतर गाजावाजा करून महाज्योती संस्थेला १५५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पण तुमच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला त्यातले ३५ कोटी पण खर्च करता आले नाही. म्हणजे वड्डेटीवारांनी या घोषणांच्या नावाखाली आपल्या तोंडाची फक्त वाफ केली. तरीही प्रसिद्धीसाठी २ कोटी रूपये का खर्च केले? या प्रश्नांची उत्तर घोषणाबहाद्दर वड्डेटीवारांनी द्यावीत नाहीतर राजीनामा द्यावा, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:30 PM 12-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here