मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते येथे दुचाकी आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. कंटेनर चालकाने दुचाकीला धडक देऊन पलायन केले. मात्र, पोलिसांनी या कंटेनरचा पाठलाग करून चालकाला पकडले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या अपघातातील शुभम मोहोड असे मयत दुचाकीस्वाराचाचे नाव आहे. हा दुचाकीस्वार लोटे येथील राहणारा असल्याची माहिती आहे. शुभम हा एकुलता एक मुलगा होता. शुभमच्या अपघाताचे वृत्त समताच कुटुंबाने मोठा आक्रोश केला. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने मोहोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मुंबई- गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण गेल्या काही दिवसांत या महामार्गावरील हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी मागील आठवड्यात मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस पुलावरून कोसळून मोठा अपघात झाला होता.
