आपल्या जिवाची बाजी लावून राजस्थानमधील कुख्यात बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी कोल्हापूर पोलीसांनी केली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलाची मान राज्यभरात उंचावली आहे. या कारवाईत सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण स्वतः एक महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. बिष्णोई गँगवर केलेल्या कारवाईबद्दल पोलीस मुख्यालयात आयोजित विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते. राजस्थानसह अन्य राज्यात खतरनाक समजल्या जाणार्या बिष्णोई गँगने धुमाकूळ घातला होता. त्यांना पकडण्यासाठी राजस्थान, कर्नाटक व इतर राज्यातील पोलीस त्यांच्या मागे होते. मात्र पोलीसांना चकवा देण्यात प्रत्येकवेळी ते यशस्वी ठरत होते. मात्र कोल्हापूर पोलीसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून, आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना अटक केली. या गुंडांना अटक केल्याने कोल्हापुर पोलीसांचा राज्यभरात सन्मान होत आहे. पोलीस दलाचे मनोबल वाढवण्यासाठी गृहराज्यमंत्री म्हणून आपण नेहमीच कार्यरत राहणार आहे.
