रायगड जिल्ह्याची आढावा बैठक राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

0

रायगड जिल्ह्यातील रखडलेला रोरो प्रकल्प, शिक्षण, आरोग्य, रस्ते, शेतकरी कर्जयोजना, पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि भरपाई, कचरा नियोजन, डम्पिंग ग्राउंड, केंद्र व राज्य शासनाच्या योजनाबाबत जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची आढावा बैठक आयोजित केली होती. राज्यपालांनी जिल्ह्यात येऊन जिल्ह्याच्या आढाव्याची घेतलेली ही पहिलीच बैठक होती. राज्यपाल यांनी घेतलेल्या या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचनाही केली. तर जिल्हा कौशल्य विकास अंतर्गत केलेल्या कामाचे आणि ओडीएफबाबत कौतुकही राज्यपालांनी केले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी आले होते. 2 जानेवारी रोजी रायगड किल्ला प्राधिकरण कामाची माहिती त्यांनी घेतली. जिल्ह्याची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सकाळी 10 वाजता जिल्ह्याच्या आढाव्याच्या बैठकीला जिल्हा नियोजन भवनात राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सुरू असलेल्या योजनांची माहिती राज्यपालांना देण्यात आली. अलिबाग मांडवा ते भाऊचा धक्का ही रोरो सेवा अद्याप सुरू झाली नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास योजनांची माहिती घेऊन त्याबाबत आढावा अधिकाऱ्यांकडून घेऊन त्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन राज्यपालांनी अधिकाऱ्यांना केले. जिल्हा कौशल्य विकास अंतर्गत अलिबाग आणि तळोजा जेलमध्ये सोलर सिस्टम बल्प दुरुस्तीबाबतचे शिक्षण कैद्यांना दिल्याने येथील सोलर बल्पची दुरुस्ती कैद्यामार्फत केली जात असल्याने राज्यपाल महोदयांनी जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. तसेच जिल्हा ओडीएफ अंतर्गत हागणदारी मुक्त झाल्याबाबतही कौतुक राज्यपालमार्फत करण्यात आले आहे. आदिवासी, कातकरी यांच्या विकासाच्या योजना त्यांच्यापर्यत पोहचण्यासाठी सूचनाही त्यांनी केल्या. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रस्त्याबाबतही माहिती घेतली. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये रायगड जिल्हा देशात 10 मध्ये असल्याबाबत समाधान व्यक्त केले. समग्र शिक्षण अंतर्गत केंद्राकडून येणारा फंड दोन वर्षापासून आला नसल्याची बाब पालकमंत्री अदिती तटकरे यांनी राज्यपालांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत लेखी पत्र देण्यास पालकमंत्री अदिती तटकरे यांना सांगून केंद्राकडे कळवितो असे सांगितले. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी राज्यपालांना गणेशमूर्ती आणि श्रीवर्धनमधील सुपारीचे रोपटे भेट दिले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्ह्यातील अधिकारी वर्ग या बैठकीला उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here