मालवण: दांडी समुद्रकिनारी 11 फेब्रुवारीला मत्स्य दुष्काळ परिषद

0

सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मत्स्य दुष्काळग्रस्त रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांच्या वेदना मांडण्यासाठी होऊ घातलेली बहुचर्चित मत्स्य दुष्काळ परिषद मालवण दांडी समुद्रकिनारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मत्स्य दुष्काळग्रस्त पारंपरिक मच्छीमारांनी मोठ्या संख्येने परिषदेस उपस्थित रहावे, असे आवाहन मालवणातील पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने करण्यात आले आहे. मत्स्य दुष्काळ परिषदेची तारीख निश्चित करण्यासंदर्भात आयोजित बैठकीस आबा वाघ, भाऊ मोरजे, संतोष शेलटकर, नितीन परूळेकर, महेंद्र पराडकर आदी मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते. परिषद तीन तास चालणार आहे. प्रत्येक वक्त्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ ठरवून दिला जाणार आहे. पारंपरिक मासेमारी प्रकारातील रापण, वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोट इंजिनच्या साह्याने गिलनेट प्रकारातील मांड मासेमारी करणारे, न्हैय मासेमारी करणारे बल्यावधारक, मासे विक्रेत्या महिला, स्वतः मासेमारीस जाणाऱ्या महिला तसेच पारंपरिक मच्छीमारांच्या मासळीची वाहतूक करणारे हातगाडी व रिक्षा टेम्पो व्यावसायिक, बर्फ कारखानदार, मच्छीमार सहकारी संस्था, मासेमारी साहित्य विक्रेते, इंजिन दुरुस्ती करणारे, मासळी एजंट, लीलाववाले याबरोबरच हॉटेल व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक, मालवणातील व्यापारी, मत्स्य खवय्ये यापैकी प्रत्येकी एक प्रतिनिधी मत्स्य दुष्काळाबाबतचा आपला लिखित स्वरुपातील अहवाल परिषदेत सादर करतील. त्यानंतर परिषदेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते आपले विचार मांडतील. पारंपरिक मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेल्या घटकांबरोबरच पारंपरिक मच्छीमारांशी संबंधित डॉक्टर्स, वकील, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांना आमंत्रित केले जाणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here