मानव, वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या उपायांबाबत प्राधान्याने विचार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

◼️ भारतीय वनसेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद

मुंबई : मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळता येईल, अशा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. भारतीय वनसेवेत काम करण्याची वेगळी वाट तुम्ही निवडली आहे. त्यामध्ये काहीतरी वेगळे करायचे ध्येया ठेवा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे सांगितले. भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रात नियुक्त परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला. या संवादा दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, जंगलात राहणाऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कसे कमी करता येईल, का याचे प्रयत्न व्हायला हवे. त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. मानव व वन्यजीव हा संघर्ष कसा कमी होईल यासाठीच्या उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि वनविभाग अशा विविध विभागांनी समन्वय राखावा लागेल. एकीकडे जंगल वाचविणे आणि दुसरीकडे त्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन याचा विचार करणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रातील विकास कामांच्या बाबतीत रस्ते, रेल्वे मार्ग करताना वन्यजीवांचाही प्राधान्याने विचार करायला हवा. त्यांचे मार्ग सुरक्षित राहतील, असे पूल, उत्तन मार्ग असे पर्याय उभे करावे लागतील. भारतीय वन सेवेत दाखल होण्याचा तुमचा निर्णय वेगळी वाट चोखळणारा आहे. आयुष्यात नवे काही तरी करायचे, असे ठरवा आणि ते निश्चयपूर्वक करा. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृक्षारोपण, जंगल क्षेत्र वाढविण्याचे उपाय तसेच वन्यजीवांचे रक्षण याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, राज्याचे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, तसेच सहा परिविक्षाधीन अधिकारी आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 19-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here