‘अफगाणच्या परागंदा राष्ट्रपतींना भारतात पाचारण करावं’ : सुब्रमण्यम स्वामी

0

नवी दिल्ली : आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी, त्यांनी अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना अफगाणिस्तानातून परागंदा झालेल्या राष्ट्रपती अशरफ गनी यांना भारतानं राहण्यासाठी पाचरण करावं, असा अनाहूत सल्ला दिलाय. गनी हे तुलनेत उच्चशिक्षित आहेत (मुख्यतः यूएस मध्ये) पाकव्याप्त काश्मीरमध्ये अमेरिकेच्या आधुनिक हत्यारांसह तालिबानकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जाईल, त्यावेळेस ते भारताला मदत करू शकतील, असंही स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. भाजपशी अंतर्गत वादाला सामोरे जात असलेल्या राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारत – अफगाणिस्तान संबंधांवर भाष्य केलंय. दोन दिवसांपूर्वी तालिबान, पाकिस्तान आणि चीन मिळून भारतावर हल्ला करू शकतात, अशी शक्यता सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली होती. भविष्यात कोण चुकीचं किंवा कोण बरोबर, याचा अंदाज लावणं हे वेळ वाया घालवणं ठरेल. यासाठी दोन किंवा अधिक संभाव्य परिणामांसाठी तयार राहण्याची गरज आहे, असंही स्वामी यांनी यावेळी म्हटलं होतं.

भारताचं लक्ष सध्या अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीयांना आणि व्हिसा धारकांना सुखरुप बाहेर काढण्याकडे आहे. यासाठी भारतीय अधिकारी अमेरिकेच्या संपर्कात आहेत. याचं कारण म्हणजे, सध्या काबूल विमानतळावर अमेरिकेच्या लष्करानं नियंत्रण मिळवलंय. आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अमेरिकेसहीत इतर देशांकडूनही सुरू आहेत. गेल्या रविवारी तालिबान्यांनी काबूलमध्ये शिरकाव केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी आपल्या काही सहकारी आणि कुटुंबासोबत देश सोडून पळ काढला. अफगाणिस्तान सोडताना चप्पलही बदलायला वेळ नव्हता. अंगावरील कपड्यासह देश सोडावा लागला, असं यानंतर अशरफ गनी यांनी म्हटलंय. अशरफ गनी यांनी अफगाणिस्तानातून पळ काढल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीत मध्ये आश्रय घेतल्याचं समोर येतंय. एका व्हिडिओ संदेशाद्वारे गनी यांनी आपण यूएईमध्ये असल्याचं जाहीर केलंय. काबूलमध्ये पुढचा रक्तपात टाळण्यासाठी आपण आपलाच देश सोडल्याचं स्पष्टीकरण गनी यांनी दिलंय. मात्र, आपल्याला तालिबान्यांच्या तावडीत सोडून देशाच्या प्रमुखानंच पळ काढल्याची नाराजी अफगाणिस्तानच्या सामान्य जनतेतून स्पष्टपणे समोर येतेय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 19-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here