विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी झालेल्या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला. मात्र आता उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार की विधानपरिषदेवर जाणार हे अजून स्पष्ट नाही. मात्र कुणीही राजीनामा न देता विधानसभा लढवण्यापेक्षा विधान परिषदेवर कुणालाही न दुखवता जाता येणे शक्य असेल तर का जायचे नाही? असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तुम्हाला विधानसभेत जायला आवडेल की विधान परिषदेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी विधानसभेवर जाणार की विधानपरिषदेवर जाणार हे रहस्य राहणार नाही. येत्या दोन-चार महिन्यांत मला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री होण्याआधी मी विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. देशात अपवादात्मक परिस्थितीत झाले असेल की, एखादी व्यक्ती स्वप्न नसताना मुख्यमंत्री झाली आहे. मी जबाबदारीतून कधीही पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन, असे त्यांनी सांगितले.
